Ahmednagar Rape News : श्रीरामपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याप्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, फरार अल्पवयीन आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरातील पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणारा आरोपी अल्पवयीन असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठी आरोपीला एका तरुणाने मदत केली.
तो तरूण मुलीला दुचाकीवर बसवून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीकडे नेऊन सोडत होता. या सततच्या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती राहिली. या घटनेने मुलीला व तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपी व त्याला मदत करणाऱ्या तरुणाविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपासाच्या सूचना केल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा देवरे पुढील तपास करीत आहेत.