Ahmednagar News : शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे यांच्या घरावर नऊ दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या वेळी चोरटयांनी सत्तुरचा धाक दाखवून रोख ६० हजार रुपये, तीस हजारांचे सोन्याचे दागिने व तीन मोबईल, असा ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
या वेळी चोरटयांनी केलेल्या हल्ल्यात बाबासाहेब ढाकणे व त्यांचे जावई मारुती खेडकर हे जखमी झाले आहेत. ही घटना दि. १३ मार्चच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामिणचे पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पो.नि. रामेश्वर कायंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी, श्वानपथक, ठसेतज्ञ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन माहिती घेतली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडूना समजलेली हकीगत अशी की, बाबासाहेब उत्तम ढाकणे रा. अंबिकानगर हे गावाजवळ वारणी रस्त्याला राहतात. दि. १३ मार्चच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कुंपनाची तार तोडून घराकडे आले.
तेथे घराच्या बाहेरच्या पोर्चमधे बाबासाहेब ढाकणे यांची मुलगी सिमा खेडकर व सिद्धेश खेडकर (नातू) हे झोपलेले होते. चोरटयांनी त्यांच्याशी पाच जण झटापट करून व सत्तुरचा धाक दाखवुन चोरट्यांनी सीमा यांचे दागिने हिसकावून घेतले. या वेळी शेजारच्या रुममधे झोपलेले बाबासाहेब ढाकणे हे आरडाओरड ऐकू आल्याने बाहेर आले. चोरटयांनी त्यांना धारदार
शस्त्राचा धाक दाखवुन घरात नेले. तेथे रोख साठ हजार रुपये घेतले. तोपर्यंत ढाकणे यांचे जावई मारुती खेडकर यांच्याशी काही चोरट्यांनी झटापट केली, या वेळी खेडकर यांच्या हाताला जखम झाली. मारुती खेडकर हे चोरट्यांच्या तालवडीतून निसटले व ओरडत गावाच्या दिशेने पळाले.
लोक जागे झाल्याने चोरटे पळुन गेले. चोरटे आल्याची माहीती मिळताच पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मटकुळे, सहाय्यक पो.नि. रामेश्वर कायंदे हे सहकाऱ्यांसह अंबिकानगरला गेले. श्वान पथक व ठसेतज्ज्ञ आले होते. चोरट्यांनी वाहनातुन पोबारा केला आहे.
याबाबत बाबासाहेब ढाकणे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ढाकणे यांच्या घरावरचा दरोडा पडल्याने लोक घाबरले आहेत. पोलिस तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याची माहीती घेतली आहे.
तपास सुरु आहे. शिवसेना तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शुभम गाडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेवून दरोड्याचा तपास लावण्याची मागणी केली आहे.