सावेडी उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून रोकड सह सोन्याचे दागिने असा ५३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सावेडी उपनगरातील धर्माधिकारी मळा येथील एका अपार्टमेंट मध्ये घडली.

गेल्या आठवडा भरात सावेडी उपनगरात अनेक ठिकाणी बंद घरे फोडली असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. याबाबत बाबुराव साहेबराव हुशंगाबादे ( रा. दुर्वांकुर सोसायटी, धर्माधिकारी मळा, सावेडी) यांनी मंगळवारी (दि. १४) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे धर्माधिकारी मळा येथील दुर्वांकुर सोसायटीमध्ये असलेल्या फ्लॅट मध्ये राहतात. रविवारी (दि.१२) सकाळी ९ वाजता फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप लावून कुटुंबासह पुणे येथे गेले होते.

तेव्हा पासून ते सोमवारी (दि.१३ ) रात्री ८.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश करत फ्लॅटमधून ५ हजाराची रोकड व सोन्याचे दागिने असा ५३ हजारांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी रात्री फिर्यादी हुशंगाबादे यांच्या फ्लॅटचे मालक यांना फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले व दरवाजा उघडा दिसला.

त्यानंतर त्यांनी हुशंगाबादे यांना फोन करून माहिती दिली. हुशंगाबादे यांनी मालक यांना घरात जावून पाहणी करायला सांगितली. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचक केल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांनी हुशंगाबादे यांना सांगितली. त्यानंतर हुशंगाबादे यांनी मंगळवारी (दि.१४) सकाळी नगर ला येवून घराची पाहणी करत पोलिसांना माहिती दिली.

ही माहिती मिळताच तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, स. पो.नि. जुबेर मुजावर, उपनिरीक्षक शैलेश पाटील आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत हुशंगाबादे यांनी मंगळवारी (दि. १४) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पो. हे. कॉ. प्रमिला गायकवाड या करत आहेत.