Ahmednagar News : सध्या गणेशउत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे व भक्तमय वातारण आहे. मात्र नगर शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्री दिन ठिकणी घरे फोडून अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांसह सात लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
पहिली घटना बुरूडगाव रोडवरील साईनगर येथे घडली आहे. येथील शेलोत यांच्या पुणे येथे राहणाऱ्या काकुंचे ७ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे त्या दिवशी दुपारी त्या त्यांच्या आई वडिलांच्या सोबत अंत्यसंस्कार व इतर विधीसाठी पुण्याला गेल्या होत्या.
४ दिवस पुण्यातच राहून त्या बुधवारी (दि.११) सायंकाळी नगरला परतल्या. त्यावेळी घरात गेल्यावर त्यांना सर्वत्र उचकापाचक झालेली दिसली. त्यांनी घरातील बेडरूम तसेच वरच्या मजल्यावरील २ बेडरूम मध्ये पाहणी केली असता सर्वत्र उचकापाचक केलेली व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व्यवस्थित असताना चोरटे घरात कुठून शिरले याची त्यांनी पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील गॅलरीचा दरवाजा तुटलेला दिसला.
चोरट्यांनी तो तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले ९ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने, त्यात मंगळसूत्र, अंगठ्या, बांगड्या, कानातील झुबे, चेन तसेच ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, जोडवे, ग्लास अशा वस्तू तसेच कपाटात ठेवलेली ४ लाख ६० हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत आरती शेलोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना धनलक्ष्मी रेसिडेन्सी अपार्टमेंट, समतानगर, तपोवन रोड येथे घडली आहे. याबाबत मोनिका किशोर नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी नागरगोजे या नोकरदार असून बुधवारी नेहमी प्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या.
घरी त्यांची मुलगी होती. ती कॉलेजला जाण्यासाठी नेहमी प्रमाणे राहत्या घराला कुलूप लावुन गेली होती. त्यानंतरच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडुन घराच्या आत प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक केली.
फिर्यादी नागरगोजे यांनी घरातील लाकडी कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची रोकड तसेच सोन्याचे व चांदीचे दागिणे असा एकुण २ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
फिर्यादी यांची मुलगी ४ वाजता कॉलेज वरून घरी आल्यावर तिला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तिने घरात जावून पाहिले असता सर्वत्र उचकापाचक केलेली दिसली. तिने आईला फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच मोनिका नागरगोजे या घरी आल्या व त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली.