चाँदबीबी महालाच्या डोंगरावर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या चुलता, पुतण्याला ५ जणांच्या टोळक्याने आम्हाला ओळखले नाही का? आम्ही नगरचे बाप आहोत, असे म्हणत चाकू, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. यातील एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत संग्राम पोपट पोटे (वय ३०, रा. बारदरी, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पोटे व त्यांचा चुलत पुतण्या यश पोटे हे दोघे बुधवारी (दि.२४) सायंकाळी ७ च्या सुमारास चांदबीबी महाल परिसरात व्यायाम करण्यासाठी गेले होते.
त्यांच्या समोरून एक चारचाकी वाहनातून ५ जण आले. त्यांनी गाडी थांबवून शिवीगाळ सुरु केली. तू साईडला हो, तू आम्हाला ओळखले नाही का? आम्ही नगरचे बाप आहोत, असे म्हणाले.
तेव्हा फिर्यादी पोटे यांनी त्यांना काय झाले असे विचारले असता गाडीतून सागर सुभाष ठोंबरे (वय ३२, रा. ब्राम्हणगल्ली, माळीवाडा), अक्षय संजय हम्मे (रा. भिंगार) व अन्य ३ अनोळखी इसम खाली उतरले व त्यांनी मोठ्याने शिवीगाळ करत पोटे चुलता, पुतण्यास लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर पोटे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून पोलिस ठाण्यात तक्रार करायला निघाले असता डोंगराच्या पायथ्याशी या टोळक्याने पुन्हा त्यांची गाडी अडवून दोघांना लाकडी दांडके, चाकू व दगडाने मारहाण केली व त्यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केले.
तसेच फिर्यादी नगर तालुका पोलिस ठाण्यात गेल्यावर पोलिस ठाण्याबाहेर थांबून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ५ जणांच्या टोळक्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सागर सुभाष ठोंबरे (वय ३२, रा. ब्राम्हणगल्ली, माळीवाडा) या आरोपीला अटक केली आहे.