अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी बनावट दस्तऐवज तयार करून जमीनविक्री करणारी टोळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : शहरासह तालुक्यातील जनतेला फसविणारी व बनावट दस्तऐवज तयार करून जमीन अथवा प्लॉटची खरेदी करून देत आर्थिक फसवणूक करणारी टोळी सक्रिय आहे. गेल्या चार महिन्यांत असे फसवणूक झालेले चार प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आले असून,

त्यापैकी एकजण पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. टोळीचा छडा लावण्यासाठी ग्रामिणचे पोलिस उपाधिक्षक सुनील पाटील यांनी लक्ष घातले असून, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.

पाथर्डी शहरात ठराविक काही मंडळी मयत खातेदार व बाहेरगावी राहत असलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तेचे बनावट मुखत्यारपत्र तयार करून या मालमत्तेची विक्री करणे, मालमत्ता धारकाच्या नावाचा व दुसरा चेहरा असलेली व्यक्ती (बनावट) उभे करून येथील खरेदीखत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात खरेदीचा व्यवहार केला जातो.

अशा प्रकाराचे चार दस्त गेल्या तीन ते चार महिन्यांत पाथर्डीत करण्यात आलेले आहे. एक मालमत्ताधारक महिला १९९८ साली मयत झालेली आहे. तिच्या जागेवर बनावट व्यक्ती उभी करून ती मालमत्ता विक्री केली गेली आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे दस्त रद्द करण्यासाठी एकाने अर्ज केला असून,

याबाबत पाथर्डी पोलिसांतदेखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिस अधिकारी याबाबत चौकशी करीत आहेत. चौकशीत मिळालेल्या पुराव्यानंतर गुन्हा नोंदविला जाईल. असेच अनेक प्रकार शहरात घडलेले आहेत.

वामनभाऊनगर येथील एका परप्रांतीय कारागिराची बनावट जागा मुखत्यारपत्र तयार करून विक्री केल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या एका प्रकरणात मयत महिलेच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून मालमत्तेची खरेदी दिली आहे.

हा प्रकार जुना नगर रस्त्याच्या बाजूच्या जमिनीबाबत घडला आहे. चवथ्या प्रकरणात मालमत्ताधारकाला अद्याप त्याची जागा विक्री झाल्याचे माहीत नाही. महसूल प्रशासनाच्या मात्र ह्या गोष्टी समोर आल्या आहेत. येथील तलाठी यांनी तहसीदारांकडे जे घडले आहे, त्याबाबत तोंडी माहिती कळविली आहे.

बनावट दस्तऐवज तयार करून जमीन विक्री करून पैसा कमवायचा, असा नवा फंडा समोर आला आहे. यामुळे ज्याची मालमत्ता आहे, त्याची फसवणूक होते.

आणि ज्याने मालमत्ता खरेदी केली त्याचीही आर्थिक लुबाडणूक व मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे प्रकार करणारे नेमके कोण आहेत, याचा तपास होण्याची गरज आहे. चौकशी झाल्यानंतर बरेच मोहरे समोर येतील.

बनावट दस्तऐवज तयार करून मयत व्यक्तीच्या नावाने जमीन विक्री केल्याप्रकरणी एक तक्रार आमच्याकडे आली असून, पोलिस अधिकारी चौकशी करीत आहेत. योग्य ती कागदपत्रे मिळताच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

खात्री करण्याचे काम सुरू आहे. मात्र, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आम्ही लवकरच याच्या मुळापर्यंत जाऊन खरे खोटे जनतेसमोर आणू. जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. : सुनील पाटील, पोलिस उपाधीक्षक, शेवगाव-पाथर्डी.