Ahmednagar News : शेतकऱ्याला मारहाण करून शेतात घुसून दीडशे कॅरेट डाळिंब चोरणारी टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींनी शेतातील डाळिंब मार्केटला नेऊन विकल्याची कबुली दिली असून, याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब सुधाकर मोटे (रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा) यांच्यासह त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याला मारहाण करून परिपक्व झालेले दीडशे कॅरेट डाळिंब चोरून नेले होते. याप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना डाळिंब चोरणारे चोरटे कोरगाव (ता. नेवासा) येथे आलेले आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोरगाव येथे सापळा लावून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. साईनाथ बाबूराव आहिरे ( रा. कोरगाव, ता. नेवासा) नवनाथ सोमनाथ गवळी ( रा. आंतरवाली, ता. नेवासा),
अक्षय दिलीप आहेर ( वय २२), लालू बाबूराव आहिरे (वय ३०) वाल्मीक बबन आहिरे (वय २२, सर्व रा. चितळी, ता. पाथर्डी), नानासाहेब चांगदेव बर्डे (वय ३०), प्रल्हाद शंकर पवार (वय ४०), विठ्ठल सोपान बर्डे( वय ३०, सर्व रा. कोरगाव, ता. नेवासा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय अकाश पोपट माळी हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपींनी शेतातील डाळिंब टेम्पोत भरून मार्केटला नेले व यातून मिळालेले पैसे चोरट्यांनी आपसात वाटून घेतले असल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर आदींच्या पथकाने केली.