Ahmednagar News : सामान्य माणूस सण उत्सव साजरे करण्यात व्यस्त असताना चोर संधी साधतात. असाच अनुभव श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरातील निवृत्त बँक अधिकारी रवींद्र भाऊसाहेब हरकल यांना आला.
शीरखुर्माचे निमंत्रण असल्याने ते शेजारी गेले. १५ मिनिटात चोरट्यांनी डाव साधत घरातील साडेतीन तोळे सोने, चांदीचे दागिने तसेच १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
याबाबत अधिक माहिती अशी, सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील नॉर्दन ब्रांच परिसरात राहणारे निवृत्त बँक अधिकारी रवींद्र हरकल त्यांच्या पत्नी वंदना यांच्यासह शेजारी राहणारे जावेदभाई यांच्याकडे शीरखुर्माचे निमंत्रण असल्याने गेले.
तोपर्यंत चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील साडेतीन तोळे सोने, चांदी तसेच १६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळण्याच्या प्रयत्नात होते. एक चोरटा घरात शिरलेला होता तर दुसरा घराबाहेर होता. तेवढ्यात रवींद्र हरकल पंधरा मिनिटांनी पुन्हा घरी आले. घरातील चोरट्याला त्यांनी पकडले देखील.
मात्र त्यांच्या हाताला हिसका देऊन तो पळून गेला. हरकल यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. शेजारील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आला; मात्र अंधारामुळे चोरटे अस्पष्ट दिसत होते. चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.