Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नेवासा मार्गालगत एका शेतात मंगळवारी सकाळी मृत बिबट्या आढळून आला. मात्र बिबट्या आजारी होता तसेच तो उपचाराविना मृत पावला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही उपचारात दिरंगाई झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
श्रीरामपूर-नेवासा मार्गालगत शेतकरी प्रशांत वाघ यांच्या शेताजवळ हा बिबट्या सापडला. माजी सरपंच सचिन पवार, दादासाहेब झिंज आदींनी वनविभाग, तलाठी यांना माहिती दिली.
त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी विठ्ठल सानप, तलाठी राजेश घोरपडे हे घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून बिबट्याला तेथून हलविले. कुरणपूर (ता. श्रीरामपूर) येथे बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी प्रतिभा पाटील या कोपरगावाहून कुरणपूर येथे दाखल झाल्या.
दरम्यान, शेतकरी प्रशांत वाघ यांनी हा बिबट्या शनिवारपासून शेतात पडून होता तसेच तो आजारी असल्याचे दिसत होते, अशी माहिती दिली. वेळीच उपचार न मिळाल्याने त्याला जीव गमवावा लागला, असे वाघ, पवार, दादासाहेब झिंज यांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी दिरंगाई केली. घटनेला तेच जबाबदार आहेत. निष्काळजीपणामुळे बिबट्याचा मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला आहे.
चौकशी करून कारवाई
वनविभागाच्या अधिकारी प्रतिभा पाटील यांना संपर्क साधला. त्या म्हणाल्या, बिबट्या दिसून आल्याबाबत स्थानिक लोकांनी कर्मचाऱ्यांना कळविले होते का? याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली आहे. फोन कॉल्स तपासले जातील. त्यात कोणी दोषी असतील तर कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
व्हायरल आजाराने मृत्यू
बिबट्याचा मृत्यू व्हायरल आजाराने झाल्याची माहिती प्रतिभा पाटील यांनी दिली. अशा प्रकारे व्हायरल आजाराने झालेला हा पहिलाच मृत्यूचा प्रकार आहे. याबाबत आणखी तपशील प्राप्त होतील, असे त्या म्हणाल्या.