Ahmednagar News : अहमदनगर येथील पंपिंग स्टेशन परिसरातील पूर्णा हॉटेल परिसरात गुरुवारी (दि. १७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले.
त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी भोंगा लावून केले.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापासून जवळ असलेल्या पंपिग स्टेशन ते पूर्णा हॉटल रस्त्यावर रात्रीही नागरिकांची गर्दी असते. जेवण झाल्यानंतर अनेक नागरिक या रस्त्याने फिरण्यासाठी जातात.
गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्णा हॉटेलच्या बाजूच्या उसातून बिबट्या रस्त्यावर आला आणि सीना नदीच्या दिशेने गेला. यावेळी बिबट्याच्या मागे अनेक कुत्रेही धावत गेले. बिबट्या हा धष्टपुष्ट होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.