भक्ष्याच्या शोधार्थ असलेला बिबट्या वनविभागाच्या सापळ्यात फसला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने अनेक ठिकाणी जीवघेणे हल्ले केले आहे. यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहे.

दरम्यान नेवासा तालुक्यातील चांदाजवळील रस्तापुर शिवारात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक बिबटया अडकला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमृत बन्सीलाल मुथ्था यांच्या शेताकडेला गेल्या सोमवारी वन विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पिंजरा लावला होता.

या परिसरात दोन ते तीन बिबटयांचा सतत वावर असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे होते. या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबटयाला भक्ष म्हणून एक शेळी ठेवण्यात आली होती.

काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्षाच्या शोधार्थ या ठिकाणी आलेला बिबट्या अलगत पिंजऱ्यात अडकला. दरम्यान वनविभागाच्या पथकाने योग्य नियोजन करत जेरबंद बिबट्याला तेथून तातडीने हलविले.

अहमदनगर लाईव्ह 24