अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- खूनाच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या एकाला येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कृष्णा रघुनाथ गायकवाड (वय 30 रा. सावेडी, मुळ रा. तेलकुडगाव ता. नेवासा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
20 जून 2019 रोजी आरोपी गायकवाडने त्याचा मित्र योगेश बाळासाहेब इथापे (रा. नगर) यांचा खून केला होता. याबाबत अधिक माहिती अशी कि, योगेशने कृष्णाला घरबांधणीसाठी एक लाख रूपये हातउसणे दिले होते.
योगेशने कृष्णाकडे या पैशाची मागणी केल्यास तो जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. आर्थिक व्यवहाराहून कृष्णा व योगेश यांच्यात भांडण झाले. यावेळी कृष्णाने हातातील टॉमीने योगेशला मारहाण करत होता.
तसेच कृष्णाने योगेशवर कोयत्याने वार केले. मारहाणीनंतर कृष्णा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी योगेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत योगेशचे वडिल बाळासाहेब इथापे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा गायकवाड विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी न्यायालयाने आरोपी कृष्णा गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. बी. बांदल यांनी मदत केली.