२५ जानेवारी २०२५ नगर : तीन वर्षांपूर्वी नगरच्या बालगृहातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध पोलिस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने लावला असून त्या मुलीला पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथून ताब्यात घेतले आहे.पुढील कारवाईसाठी तिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या बाबतची माहिती अशी की, ७ ऑगस्ट २०२२ रोजी अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीस नगर येथील मुलींचे बालगृह येथुन फुस लावुन पळवून नेले होते. या बाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास न लागल्याने हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयु) यांचेकडे गुन्ह्यात भा.दं. वि. ३७० हे वाढीव कलम लावून तपास कामी वर्ग करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब शिंदे हे करीत होते.
निरीक्षक राजेंद्र इंगळे व शाखेचे अधिकारी, अंमलदार हे वेगवेगळ्या मार्गाने माहिती काढून शोध घेत असता त्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील अपहृत मुलगी ही पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे आहे.मिळालेल्या माहितीच्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी पथकासह वेल्हे येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने अपहृत मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आल्याने तिला ताब्यात घेत नगरमध्ये आणून पुढील तपास कामी कोतवाली पोलीस ठाण्यात येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधिक्षक गणेश उगले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस अंमलदार समीर सय्यद, महिला पोलिस अंमलदार अर्चना काळे, अनिता पवार, छाया रांधवन, चालक पोलिस कॉन्स्टेबल एस. एस. काळे यांनी केली आहे.