Ahmednagar News : दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्या अंतर्गत कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस नाईक तुकाराम खेडकर,
वय ३५ याच्यासह देवसडेतील खासगी इसम नंदू पांडुरंग सरोदे व पोपट सरोदे अशा तीन जणांवर नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून १६ एप्रिल रोजी पाच हजारांची लाच घेताना यांना रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सहकार्य करण्यासाठी खासगी इसम नंदू सरोदे व पोलिस नाईक तुकाराम खेडकर यांनी तक्रारदारांकडे दहा हजारांची मागणी केली.
तक्रादाराने याप्रकरणी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १२ एप्रिल रोजी तक्रार केली. पडताळणीत खासगी इसम नंदू सरोदे याने तक्रारदाराकडे पोलिस नाईक खेडकर यांच्यासाठी दहा हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तर खासगी इसम पोपट सरोदे याने तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले. १६ एप्रिल रोजी पोलिस नाईक खेडकर यांनी तक्रारदारांकडे दहा हजारांची मागणी करून तडजोडी अंती आठ हजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजारांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पोलिस नाईक खेडकर यांच्याविरुद्ध सापळा रचून कारवाई केली. यात पोलिस नाईक खेडकर यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून पाच हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी त्याला रकमेसह रंगेहात पकडण्यात आले. आरोपी पोलिस नाईक तुकाराम खेडकर, खासगी इसम नंदू सरोदे व पोपट सरोदे यांच्या विरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक छाया के. देवरे, पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलिस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, महिला पोलिस राधा खेमनर व सना सय्यद, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपाधीक्षक लोखंडे यांनी केले.