अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- अतिक्रमणाच्या वादावरून महिलेसह कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली होती. या घटनेचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर दोन तास रस्त्यावरच धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचितचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत नेवासा पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, कुकाणा येथे अतिक्रमणाच्या वादातून गोर्डे कुटुंबीयातील महिलेसह इतरांना बेदम मारहाण झाली.

या घटनेचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असताना मारहाण करणाऱ्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. दरम्यान रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये हरीश चक्रनारायण (रा. नेवासा खुर्द), किसन चव्हाण (रा. शेवगाव), सुरेश अडागळे (रा. सौंदाळा, ता. नेवासा), प्यारेलाल शेख (रा. शेवगाव), विजय कचरे, विशाल इंगळे, विलास देशमुख, अक्षय गोर्डे (रा. कुकाणा, ता. नेवासा), कैलास पवार (रा. वडुले, ता.नेवासा),

विजय गायकवाड (रा. राहुरी), मुकेश मानकर (रा. गदेवाडी, ता. शेवगाव), भारू ऊर्फ रवींद्र म्हस्के (रा. कोरडगाव, ता. शेवगाव) व इतर ३० ते ४० यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.