अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- सोने, चांदी, पैसे आदी चोरीच्या घटना याआधी आपण ऐकल्या असतील, मात्र मुक्या प्राण्याला चोरल्याची घटना जिल्ह्यातील सुपा येथे घडली आहे.
पळविलेले कुत्र्याचे पिल्लू हे मृत अवस्थेत आढळून आले आहे. हि धक्कादायक घटना नारायण गव्हाण येथे घडली आहे. याप्रकरणी हॉटेलचे मालक साहिल राजेंद्र गाडेकर यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र राजेंद्र वैराट याच्या विरोधात चोरी व कुत्र्याला ठार मारण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी वैराट हा २३ डिसेंबर रोजी मित्रांसोबत शिर्डी येथे जात असताना तो नारायण गव्हाण येथील महिंद्रा हॉटेलवर थांबला असताना त्याने हॉटेलमधील कुत्र्याचे पिल्लू चोरून नेले.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहिल्यानंतर वैराट याची चोरी निदर्शनास आली. याबाबत गाडेकर यांनी सुपा पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी वैराट याच्याशी संपर्क साधला असता चोरलेले पिल्लू हॉटेलजवळ सोडून दिल्याचे सांगितले.
मात्र त्याचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी वैराट याला अटक केली जाणार असल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल पठाण यांनी सांगितली.