अहमदनगर बातम्या

राहुरी तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; घरात घुसून मारहाण करत दागिने लुटले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील रोख रक्कम सुमारे २० हजार व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी- चेडगाव रस्त्यावरील तरवडे वस्तीवर मध्यरात्री घडली आहे.

दरोडेखोरांच्या हल्ल्यात रावसाहेब बापू तरवडे हे जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री एक-दीडच्या सुमारास रावसाहेब बापू तरवडे यांच्या घरी चोरटे आले.

अगोदर त्यांनी रावसाहेब यांचा मुलगा मनोज तरवडे यांच्या खोलीची बाहेरून कडी लावून घेतली. त्यानंतर रावसाहेब तरवडे व त्यांच्या पत्नी यांच्या खोलीत शिरले.

गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी रावसाहेब तरवडे यांना मारहाण करत घरातील रोख रक्कम व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावले. आरडाओरडा ऐकून मनोज तरवडे यांना जाग आली.

मात्र, आपल्या खोलीची बाहेरून कडी लावल्याचे समजताच त्यांनी शेजारी राहणारे चुलत भाऊ, चुलते यांना फोन केला. शेजारील लोक काही वेळात बाहेर आले.

मनोज तरवडे यांनी शेजारील लोकांना फोन लावल्याचे लक्षात येताच त्या दोघा चोरट्यांनी सावध पवित्रा घेत पळ काढला. परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशन, वांबोरी पोलीस दूरक्षेत्र व नगर येथील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.तसेच या चोरट्यांचा शोध सुरु आहे.

Ahmednagarlive24 Office