अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- अतिवृष्टीच्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच आता जामखेड तालुक्यातील शेतकरी रानडुक्कराच्या उपद्रवामुळे हैराण झाला आहे. शेतात उभी पिके या नुकतीच पेरणी केलेले बियाणे रानडुक्करांचे कळप फस्त करत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी तीन तीन वेळा पेरणी करूनही हाच अनुभव आल्याने आता पीकच नको अशी भावना शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. अनेकजण तर शेतच पडिक ठेवलेले बरे असा विचार बोलून दाखवत आहेत. तालुक्यातील डुकराची संख्या झपाट्याने वाढत असून, या वर नियंत्रण मिळविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे.
डुकरांच्या उपद्रवाला कंटाळून शेतकरी शेतात रात्री बेरात्री जागरण करून शेताची राखण करत आहेत. मात्र सर्वच शेतकऱ्यांना जागे राहणे शक्य नाही. दिवसभरातील कामाचा थकवा, वाघाची भीती, व शेतात जाण्यासाठी असलेले खराब रस्ते हे पाहता रात्री पुन्हा शेतावर जाणे शक्य नाही मात्र डुकरे या पिकावर ताव मारून मोकळे होत आहेत.
खरीप हंगामात भुईमूग पीक शिवारात रानडुक्करांनी कोठेही ठेवले नाही. अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी होते ज्वारी पेरणीचा हंगाम संपल्याने आता मका हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. पण हरभरा व मका पीक पेरणीच्या दिवशी रानडुक्करांचा कळप शेतात घुसून बियाणे फस्त करतात अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली.
तरीही पेरणी दिवशीच रानडुक्करे शेतात घुसून बियाणे फस्त करत आहेत. यामुळे खत व बियाणांचा खर्च आता परवडत नाही त्यामुळे शेत पडीक ठेवलेले बरे अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसते.
उभ्या पिकांचेही रानडुक्करे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वनविभागाने ताबडतोब रानडुक्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर शेतकरी करत आहेत.