शासनाने एक रूपयात पीकविमा योजनेची घोषणा केली. मात्र नेवासा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन, कापुस, बाजरी, मुग, मका, उडीद, तुर या पिकासाठी पीक विमा भरला होता. परंतु सदर पीकाचा विमा परतावा अद्याप न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
विमा रक्कम मिळण्यासाठी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मुख्यमंत्री यांनी अनुदानाची घोषणा केली असली तरी अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने शेतकऱ्यांत मोठी नाराजी पसरली आहे.
एक रुपयात विमा असला, तरी ऑनलाईन फी, प्रति फार्म शंभर रूपये, सातबारा उतारा, ८-अ व इतर कागदपत्रांच्या झेरॉक्ससाठी २०० ते ३०० रुपये शेतकऱ्यांचा खर्च होऊन फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी तीन ते चार दिवस चकरा माराव्या लागतात.
त्यामुळे वेळ वाया गेला तरीदेखील अद्याप पीकविमा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणाबाबत संताप व्यक्त होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी अधिकारी यांची चौकशी केली असता, याबाबत आम्हाला काहीही माहिती नसल्याचे सांगत असून विमा कंपनी अधिकारी देखील योग्य माहिती देत नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत चौकशी कुठे आणि कोणाकडे करावयाची याचा संभ्रम निर्माण झाला आहे. पीकविमा नुकसान भरपाईबाबत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केलेल्या असून विमा कंपनीचे कर्मचारी यांना समक्ष भेटून देखील शेतकऱ्यांनी तक्रारीची नोंद केली असून ही अद्याप नुकसान परतावा मिळाला नाही.
याबाबत अनेक शेतकऱ्यांनी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्याकडे लेखी तक्रार करुन पीकविम्याची मागणी केली आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून विमा परतावा न मिळल्यास शासनाला शेतकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागेल.
याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास रास्तारोको अंदोलन केले जाईल, असे खरवंडीचे शिवसेना शाखा प्रमुख बाळासाहेब कुडे, मेजर अरूण फाटके, उपसरपंच गणेश फाटके, ग्रा.पं. सदस्य संतोष राजळे, सामाजिक कार्यकर्ते कचरु सुरवसे, विश्वनाथ वाघ, शरद भोगे, प्रसाद राजळे, सोसायटीचे चेअरमन इमाम चाँद शेख, रोहिदास भोगे, बाबासाहेब भोगे, गोरख कातोरे यांनी सांगितले.