दिल्लीतील शेतकरी आंदोलनास आम आदमी पार्टीचा पाठिंबा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे गेल्या सात दिवसापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

मार्केटयार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन शेतकरी आंदोलकांचे मागण्या मान्य करीत शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात शहर जिल्हा संघटक प्रा.अशोक डोंगरे, शहर महिला आघाडी अध्यक्षा सुचिता शेळके, रेव्ह. आश्‍विन शेळके, राजू शेख, अण्णा आळकुटे, रावसाहेब चिंधे, विकास निमसे, सतीश बेरड आदि उपस्थित होते.

भाजपप्रणित मोदी सरकारने बहुमताचा फायदा घेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपुर्ण देशातील शेतकरी पेटून उठले आहेत. तिन्ही शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत मागील सात दिवसापासून आंदोलन सुरु असून, सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाची दखल घेत नसल्याने दिवसंदिवस या आंदोलनाची धग वाढत आहे.

शेतकरी आंदोलकांचे मागण्या मान्य करुन शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे व आंदोलक शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकर्‍यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन केंद्र सरकार भांडवलदारांच्या दावणीला बांधले गेले आहे. काद्याला विरोध दर्शविणार्‍या शेतकर्‍यांवर लाठी हल्ला, अश्रूधुर व पाण्याचे फवारे मारुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

शेतकरी कोरोनातील टाळेबंदी, नैसर्गिक संकटाने ग्रासलेला असताना शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतकर्‍यांना आत्महत्येच्या दरीत लोटण्याचा हा प्रकार सुरु आहे. तातडीने संसेदत विशेष अधिवेशन घेऊन शेतीविषयक कायदे रद्द करण्याची गरज असल्याचे प्रा.अशोक डोंगरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24