Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध चोरीच्या घटना घडताना दिसतात. पैसे, ऐवज आदींसह शेतीमाल चोरण्याच्याही घटना घडताना दिसतात. आता मात्र थक्क करणारी घटना समोर आली आहे.
थोडे तिडके नव्हे तर तब्बल पाच एकरावरील तूर चोरून नेण्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद येथे ही घटना घडली.
पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद येथील गट नंबर ११३१/५ मधील ५ एकर क्षेत्रातील तुरीचे पीक हार्वेस्टरच्या सहाय्याने काढून त्याची चोरी केल्याप्रकरणी आंदन गुण्या काळे व सिताबाई गुण्या काळे दोघेही रा. कामरगांव, ता. नगर यांच्याविरोधात सुपा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात देवदास इमराज भोसले (हल्ली राहणार इंदिरानगर मुखई, ता. शिरूर) यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, रांजणगांव मशिद येथील त्यांच्या पाच एकर शेतीमध्ये त्यांनी तुरीचे पिक पेरले होते.
दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास देवदास भोसले हे तुर काढण्यासाठी शेतामध्ये गेले. तेथे सर्व तूर हार्वेस्टर यंत्राच्या मदतीने काढून घेण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याच वेळी आंदन गुण्या काळे व सिताबाई गुण्या काळे हे डोक्यावर
तुरीची बाचकी घेऊन पळत जात असल्याचे देवदास काळे यांनी पाहिले. देवदास काळे यांना पाहिल्यानंतर आंदन व सिताबाई तेथून पळून गेले.
देवदास काळे यांनी रांजणगांव मशिद गावात जाऊन हार्वेस्टरचालक विलास वाळके यांच्याकडे चौकशी केली असता आंदन काळे व सिताबाई काळे यांनी हार्वेस्टरचे भाडे देऊन तूर काढण्यास सांगितले होते अशी माहीती मिळाली.
पाच एकर क्षेत्रावरील पांढऱ्या तुरीच्या शेंगा चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर देवदास काळे यांनी सुपा पोलीस ठाण्यात धाव घेतली. आंदन व सिताबाई काळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. काळे यांच्या फिर्यादीवरून आंदन व सिताबाई यांच्यावर शेतीमधील तूर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.