Ahmednagar News : महाराष्ट्राला विविध परंपरांचा वारसा आहे. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक वारसा महत्वपूर्ण असून आजही या परंपरा पाळल्या जातात. अशीच एक परंपरा म्हणजे अनेक धार्मिक स्थळी गुढी पाडव्याला व्होईक वर्तवले जाते.
यातील एक महत्वपूर्ण म्हणजे चांदेकसारे येथील बाल भैरवनाथ व्होईक. तब्बल बाराशे वर्षांपूर्वीची परंपरा आजही चांदेकसारे ग्रामस्थांनी सुरू ठेवली आहे. यावर्षी महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून अन्नधान्य मुबलक पिकेल,
तसेच चालू वर्षात अनेकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील असा कौल चांदेकसारे येथील व्होईकात दिला आहे.
कशी असते व्होईक वर्तवण्याची पद्धत?
नक्षत्र रुपी खड्यामध्ये वडाच्या पानांमध्ये जर जास्त पाणी शिल्लक राहिले, तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस, ज्या नक्षत्ररुपी खड्यात मध्यम पाणी शिल्लक राहील, त्या नक्षत्रात मध्यम पाऊस, तर ज्या नक्षत्र रुपी खड्यात पाणीच शिल्लक राहणार नाही, ते नक्षत्र कोरडे जाणार असल्याचे व्होईक सांगितला जातो.
यानुसार आता अश्विनी नक्षत्रात चांगला पाऊस, भरणी नक्षत्रात चांगला पाऊस, कल्याणी कृतिका व रोहिणी नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. मृग नक्षत्रात खूप चांगला पाऊस, आर्द्रता पुनर्वसू नक्षत्रात जेमतेम पाऊस, पुष्य नक्षत्रात चांगला पाऊस,
आश्लेषा नक्षत्रात जेमतेम, मघा पूर्वा नक्षत्रात जेमतेम, उत्तरा हस्त व चित्रा नक्षत्रात चांगल्या प्रकारे पाऊस, स्वाती विशाखा अनुराधा व ज्येष्ठा नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस अशाप्रकारे बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरीने पावसाचा कौल दिला आहे.
असे असतील धार्मिक कार्यक्रम
ग्रामस्थांच्या उपस्थितीत चांदेकसारे यात्रेचे नियोजन करण्यात आले. तेलवण मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी पडणार आहे. देवाला हळद १६ एप्रिलला लावण्यात येईल. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत तेलवण अर्थात उपवास करण्यात येणार आहे.
१७ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव, तर बाल भैरवनाथ व जोगेश्वरीचा रथ उत्सव २१ रोजी असणार आहे. जत्रा व कुस्त्यांचा हंगामा २२ एप्रिल रोजी होईल. हनुमान जयंती २३ एप्रिलला असून, भैरवनाथ यात्रा उत्सव जवळपास पंधरा दिवस चालणार आहे.