स्वीकृत नगरसेवकाने दिला राजीनामा,म्हणाले सभागृहात पाच मिनिटात…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राहाता नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक साहेबराव निधाने यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक विजय सदाफळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

गटनेते विजय सदाफळ यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक साहेबराव निधाने यांनी म्हटले आहे की, सन २०१६ मध्ये राहाता नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्यपदी जनविकास आघाडीकडून मला नियुक्त केले होते.

माझ्या खाजगी कारणामुळे मी स्वत: राजीखुशीने राजीनामा देत आहे. त्याचा स्वीकार करावा, अशी विनंती या राजीनामा पत्रात केली असून सदरचे राजीनामा पत्र गटनेते विजय सदाफळ यांच्याकडे सुपूर्द केले आहे. माहितीस्तव माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व राहाता नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला जाणार आहे.

राजीनामा पत्राबाबत नगरसेवक निधाने यांचेशी संपर्क साधला असता नगरपालिकेतील सहमतीचे राजकारणाने सभागृहात बोलणे कठीण झाले आहे. तसेच सभागृहात पाच मिनिटात संपुष्टात येणाऱ्या बैठका व अयोग्य पद्धतीने चाललेला कारभार तसेच विकास कामांना वाव नसल्याने आपण राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24