अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- चारचाकी वाहन चालविताना सिटबेल्ट लावल्यास तसेच दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान केल्यास रस्ता अपघाता दरम्यान होणारी जीवितहानी निश्चित टळू शकते, असे प्रतिपादन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले.
भारत सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार स्वयंप्रेरणेने सीटबेल्ट लावणार्या व हेल्मेट वापरणार्या वाहनचालकांचा गुलाब पुष्प व नव वर्षाचे पॉकेट कॅलेंडर देऊन रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, रस्ते अपघात कमी व्हावेत, अपघात झाल्यानंतर जीवीत हानी टळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत असते.
शासनाच्या या प्रयत्नांना जनतेने रहदारीचे नियम पाळून सहकार्य केले पाहीजे. यावेळी शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे म्हणाले की, शहरीकरणामुळे रहदारी दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहनांची संख्या वाढत असतांना प्रशिक्षीत वाहन चालकांची संख्या देखील वाढणे आवश्यक आहे. वाहन चालवतांना सर्व नियम व बारकावे अवगत करणे तसेच महामार्गावर वेगमर्यादा पाळणे फार महत्वाचे आहे.