Ahmednagar News : लोणीव्यंकनाथ येथील श्रीगोंदा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाली. श्रीकांत नारायण ओलाला ( वय ४२ रा. भानगाव, श्रीगोंदा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी,
नगर दौंड महामार्गावरील लोणी व्यंकनाथ येथील पारगाव चौकात नगर कडून काष्टी कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचालकाला ट्रकचा वेग आवरता न आल्याने पुढे चाललेल्या चारचाकी गाडीला वाचविण्याच्या नादात काष्टी कडून नगरकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली.
या भीषण धडकेत भानगाव येथील ४२ वर्षीय श्रीकांत नारायण ओलाला हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी जखमी ओलाला यांना लोणीव्यंकनाथ येथील दवाखान्यात नेत प्रथमोपचार करत दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता,
उपचारापूर्वीच डॉक्टरांनी जखमी ओलाला यांना मयत घोषित केले. या बाबत रात्री उशिरा पर्यंत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कोणताच गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.