नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे (वय ३२), या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (दि. २५) रोजी दुपारी घडली. घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत मृतदेह महावितरण कंपनीच्या जेऊर उपकेंद्र कार्यालयात आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.
बहिरवाडी येथील शेतकरी रवींद्र पाटोळे हे शेतामध्ये काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने मयत झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच रवींद्र याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह जेऊर येथील उपकेंद्राच्या कार्यालयात आणून ठेवला. सुमारे सहा तास मृतदेह महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता.
दुपारी एक वाजता घटना घडल्यानंतर संध्याकाळी सहा वा. जता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जेऊर परिसरात यापूर्वीदेखील अशा घटना घडलेल्या आहेत. तरीदेखील महावितरण कंपनीच्या कामकाजात सुधारणा होत नाही.
तसेच अद्यापपर्यंत मयत व्यक्ती अथवा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या गाय, म्हैस, बैल यांच्या मालकांना आर्थिक मोबदला मिळाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. महावितरण कंपनी परिसरात सुमारे ४०० ते ५०० लोकांचा जमाव जमल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत अंत्यसंस्कार महावितरण कंपनीच्या दारातच करण्याची भूमिका घेतली, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, प्रभारी उपकार्यकारी अभियंता दिलीप झांजे, कनिष्ठ अभियंता सागर बेंडकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. अखेर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मयत रवींद्र यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या वेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सपोनि माणिक चौधरी यांची यशस्वी मध्यस्थी !
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महावितरण कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थांमध्ये समझोता घडविण्याबाबत मध्यस्थी केली. सुमारे सहा तास सुरू असलेला गोंधळ सपोनि. चौधरी यांनी घटनास्थळावर आल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांत मिटवून यशस्वी मध्यस्ती केली अन् मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.