Ahmednagar News : मागील वादाच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली होती. या खुनाच्या गुन्ह्याची २४ तासाच्या आत उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून यातील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह याचा अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात फरशी मारुन खून केला होता. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांना पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.
त्यानूसार श्री. आहेर यांच्या पथकातील पोहेकॉ संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ संभाजी कोतकर यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला.
शाहरुखच्या कुटूंबियाकडे विचारपुस करत असताना त्यांनी काही दिवसांपुर्वी शाहरुख याचे अशोक साळवे (रा. नॉर्दन ब्रॉच, श्रीरामपूर) याच्याबरोबर वाद झाला होता अशी माहिती दिली.
पथकाने त्या आधारे संशयीताचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. त्यामुळे पथकाचा संशय अधिक बळावला. पथकाने लागलीच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेत तो पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
त्यानूसार पथकाने सदर ठिकाणाहून त्यास ताब्यात घेतले. त्याने शाहरुख सोबत वाद झाल्याने खुन केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहेत