अहमदनगर बातम्या

कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक

सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिग मी इंडिया कंपनीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ राऊत याच्यासह सात संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सतीश खोंडवे (रा. कागल जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान राऊत हा गुन्हा दाखल होण्याच्या अगोदरच पसार झालेला होता. तो सावेडीतील गुलमोहर रस्ता भागात वेशांतर करून आल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्यास अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Ahmednagarlive24 Office