अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या ४१ वर्षीय आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
लक्ष्मीकांत नारायण ढगे (वय ४१ वर्षे, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, नवलेनगर, गुलमोहर रोड, नगर) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश एम. व्हि. देशपांडे यांनी हा निकाल सुनावला. १५ एप्रिल २०१७ रोजी अल्पवयीन मुली दिल्लीगेटहून पेपर घेऊन घरी परत येत होत्या.
त्यावेळी लक्ष्मीकांत ढगे याने तिला अडवून चौथीचे क्लास कुठे आहेत, अशी चौकशी करून तिचा विनयभंग केला. परंतु, हा प्रकार पीडीत मुलीच्या घरी दुध घालणाऱ्या व्यक्तीने व एका ओळखीच्या व्यक्तीने पाहिला. त्यांनी आरोपीची विचारपूस करून घडलेला प्रकार हा पीडितेच्या वडिलांना सांगितला. त्यांनीही चाैकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर वडिलांनी पीडित मुलगी व इतर व्यक्तींसह आरोपीस चाईल्डलाईनचे कार्यालयात घेऊन गेले. तेथे त्यांनी घडलेला प्रकार सांगितला.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका साक्षीदारानेही आरोपीला ओळखले. त्यांनीदेखील मार्च महिन्यात त्यांची अल्पवयीन मुलगी चितळे रोडवर फुले आणण्यासाठी जात असताना आरोपी लक्ष्मीकांत ढगे याने तिचा विनयभंग केल्याचे सांगितले.
त्यामुळे या घटनेबाबत तोफखाना पोलिसात विनयभंग व पोक्सो कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला फौजदार के. शिरदावडे यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात अतिरीक्त सरकारी वकील मोहन पी. कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. पीडित मुली, पालक, साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावली.