अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रमेश पंदरकर यांच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता चौकशीअंती सदर मृतदेह हा लता मधुकर शिंदे राहणार विसापूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले
लता शिंदे यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने मारून त्यांचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे प्रेत तुटलेल्या उसाच्या पिकात टाकून देण्यात आले होते.
हत्येचे नेमके कारण स्पष्ट नसताना बेलवंडी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने तीन दिवस रात्रंदिवस प्रयत्न केले. विसापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी दुकानासमोरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून एका परप्रांतीय आरोपीला अटक केली.
सध्या बेलवंडी (ता. श्रीगोदा) येथे राहत असलेला व मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असणारा मुकेश मोतीलाल गुप्तता (वय २८ रा. मेहबूबनगर ता. जि. भदोई) यास अटक केली आहे.
कोणतेही कारण नसताना महिलेची हत्या झाल्याने पोलीस यंत्रणा चक्रावली होती. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे फिरविली.
बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांनी वेगवेगळी पथके तयार करून अवघड गुन्ह्याचा शोध घेण्याचा चंग बांधला होता.
या पथकाने विसापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता या मनोरुग्ण महिलेच्या पाठीमागे गुरुवारी रात्री जात असताना ती व्यक्ती दिसून आली.
या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या आरोपीने गुन्हा कबूल केला असला तरी या मनोरुग्ण महिलेची हत्या कशासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.