अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात बसविलेल्या महावितरणच्या विद्युत ट्रान्सफार्मरची चोरी करणार्या एकाला कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
कचरू मच्छिंद्र भुसारी (रा. आखदवाडी ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
साईदीप बिडकॉन कंपनीच्यावतीने कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातून ट्रान्सफार्मर चोरीस गेल्याची फिर्याद मनिषकुमार दत्तात्रय गिड्डे (रा. सोलापूर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती.
कंपनीत सुपरवायझर पदावरून काढून टाकलेला गणेश भारत पोळ आणि कचरू भुसारी यांनी ट्रान्सफार्मर चोरल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला होता. कोतवाली पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला.
यात चोरी गेलेला ट्रान्सफार्मर पिकअपमध्ये नेवून तो सोनई परिसरात सोडून आरोपी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सोनईत जावून सदर मुद्देमाल ताब्यात घेत आरोपी भुसारी याला अटक केली आहे.
यावेळी पोलिसांनी आरोपीकडून दीड लाख रुपयांचा ट्रान्सफार्मर, तीन लाखांची पिकअप गाडी असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.