अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- येरवडा कारागृहाचे गज कापून फरार झालेला आरोपीला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या आरोपीला कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात सापळा रचुन जेरबंद केले. ही कारवाई कर्जतचे पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जतचे पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,
येरवडा कारागृहातुन गज कापुन फरार झालेला आरोपी अनिल विठ्ठल वेताळ (वय 22, रा. शिरूर, जि. पुणे) हा कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी शिवारात येणार आहे.
माहिती मिळताच जाधव यांनी आपल्या कार्यालयीन पथकास योग्य सुचना देऊन कारवाई करण्याचे सांगितले. दरम्यान राक्षसवाडी शिवारात माळरानावर रात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून आरोपी वेताळ यास ताब्यात घेण्यात यश मिळवले.
सदर आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याच्या विरुद्ध पुणे जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, असे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच सदर आरोपीने येरवडा कारागृहातून गज कापून पळाल्याने येरवडा पोलीस ठाण्यात कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.