नेवासा : नेवासा तालुक्यात जायकवाडी धरणाच्या पाणी फुगवट्यातून प्रवरा संगम, म्हाळापुर परिसरातून विना परवाना पाणी उपसा करणाऱ्या ६ मोटार पंप व १७ स्टार्टरची जप्ती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जलाशय फुगवटा नेवासा शाखा, महसूल, महावितरण कंपनी व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत दि. ७ रोजी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई ३० सप्टेंबरपर्यंत सुरच राहणार असल्याचे शाखा अधिकारी विजय काकडे यांनी सांगितले. नेवासा तालुक्यात एकुण ३५०० परवानाधारक शेतकरी असुन त्यापैकी १५०० परवान्यांची मुदत संपली असुन त्यांचे नुतनीकरण होत नसल्याने शेतकरीही धास्तावले आहेत.जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या जलाशय फुगवटा नेवासा शाखेकडून महसूल, वीज वितरण कंपनी व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकामार्फत जलाशयातून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कारवाई अंतर्गत मोटारींचा विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर आता मोटारीच जप्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांची उभी पीके धोक्यात आली आहेत. नुतणीकरणासाठी अनेकांना धावपळ करावी लागत आहे.सदरील मोहीम हि जलसंपदा विभागाचा दि.१२ डिसेंबर २०१८ रोजीचा शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशांच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, नगर भाग, अहमदनगर यांनी काढलेल्या आदेशानुसार होत आहे.
जलाशय किनाऱ्यावर काही निवडक ठिकाणीच मोठ्या संख्येने मोटारी असल्याने व प्रत्येक मोटारीच्या ओळखीसाठी विद्युत मीटर अथवा पेटीवर नावे लिहिलेली नसल्याने कारवाई करताना पथकाला अडचणीला सामोरे जावे लागत आहे.