Kunbi Caste Certificate : कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणत्याही सेतू चालकांनी अडवणूक केल्यास, तसेच प्रमाणापेक्षा जास्त पैसे मागितल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल,
असे आश्वासन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सकल मराठा समाजाला दिले आहे.
श्रीरामपूर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधींनी तहसीलदार वाघ व नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी सुरेश कांगुणे यांनी सांगितले की, श्रीरामपूर तालुक्यात कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याकरिता महसूल विभागाने अनेक ठिकाणी लाभार्थीच्या सोयीकरीता शिबिरे आयोजित करून कागदपत्रे घेतलेली आहेत. त्यामधील काही बांधवांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले आहे.
मराठा बांधवांना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची याकरिता मोठ्या प्रमाणात सहकार्य व मदत लाभत आहे. परंतु काही सेतू चालकांकडून कुणबी प्रकरण दाखल करून घेण्यासाठी अडवणूक केली जात आहे.
त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र करिता काही सेतू चालक ५० रुपये फी घेण्याऐवजी हजारो रुपयांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तहसीलदार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.
यावेळी तहसीलदार वाघ म्हणाले की, सदरचा प्रकार अतिशय गंभीर आहे. मराठा बांधवांची अडवणूक झाल्यास किंवा जादा पैसे सेतू चालकाने मागितल्यास आपल्याशी संपर्क साधावा.
या संदर्भात सर्व सेतू चालकांची मिटिंग घेऊन त्यांना कोणत्याही व्यक्तींची निष्कारण अडवणूक करू नये, तसेच जादा पैसे घेऊ नये, अशा सूचना दिल्या जातील. त्यानंतरही जर असे घडले, तर संबंधित सेतू चालकावर कडक कारवाई केली जाईल.
यावेळी नागेश सावंत, श्रीकृष्ण बडाख, राजेंद्र मोरगे, राजेंद्र भोसले आदींनी कुणबी दाखल्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. याप्रसंगी अनिल उंडे, शरद नवले, गोकुळ गायकवाड, अमोल बोंबले, शशिकांत गायधने, सुधाकर तावडे,
भाऊसाहेब गायधने, चंद्रकांत शेळके, बाळासाहेब मेटे, चंद्रकांत काळे, दत्तात्रय जाधव, सुनील उंडे, चैतन्य गायधने, प्रसाद खरात, निखिल शेळके, सागर थोरात, सुधीर गडाख, किशोर घोरपडे, दिलीप थोरात, महेश बोंबले, रावसाहेब भोसले, ऋषिकेश मोरगे, जालिंदर कर्जुले आदी मराठा बांधव उपस्थित होते.