आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी,अवेळी बंद व डॉक्टरांची….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या मौजे टाकळी काझी (ता. नगर) येथील शासकीय आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

सदर मागणीचे निवेदन जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) वासुदेव सोळंके यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, नगर शहराध्यक्ष शहानवाज शेख, नेवासा उपाध्यक्ष किरण जावळे, सहसचिव संतोष त्र्यंबके, युवा अध्यक्ष मच्छिंद्र गांगर्डे, नगर उपाध्यक्ष सुशील साळवे, संपर्कप्रमुख लक्ष्मण शिंदे, गणेश निमसे, वजीर सय्यद, दीपक गुगळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, टाकळी काझी येथील आरोग्य केंद्रात 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्याच्या आत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तसेच इतर कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते. मुख्यद्वारावर कुलूप लावण्यात आले होते. त्या ठिकाणी अर्धा ते पाऊण तास बसून देखील संबंधीत व्यक्ती उपलब्ध झाले नाही. आसपासच्या नागरिकांना विचारपूस केली असता या ठिकाणी डॉक्टर तसेच कर्मचारी कुठल्याही वेळेत ये-जा करत असल्याचे कळले.

संघटनेचे पदाधिकारी आल्याचे कळल्यानंतर साधारण एक तासाने एक परिचारिकाने येऊन आरोग्य केंद्रातील टाळे उघडले. तीन दिवस आधी सदर आरोग्य केंद्रावर गेले असता त्यावेळेस सुद्धा या आरोग्य केंद्रावर डॉक्टर किंवा परिचारिका उपलब्ध नव्हत्या. सदर प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांना कळवले असता त्यांनी एका परिचारिकेला फोन करुन उपचार देण्यास सांगितले. सदर परिचारिकेची भाषा देखील अत्यंत उध्दटपणाची होती.

येणार्‍या रुग्णांना परिचारिका उध्दट बोलून हुसकावून लावत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मौजे टाकळी काझी येथील शासकीय आरोग्य केंद्र कोणत्या कारणाने बंद ठेवण्यात आले?, सदर आरोग्य केंद्र बंद असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादा रुग्ण आला असता त्याच्या जिवेचे बरे वाईट झाले असते. मोठा खर्च करुन रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी हे शासकीय आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे.

मात्र अवेळी बंद असणारे व डॉक्टरांची उपस्थिती नसलेल्या मौजे टाकळी काझी येथील शासकीय आरोग्य केंद्रातील प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. येत्या सात दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24