अहमदनगर(प्रतिनिधी)- ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक पुरुषोत्तम सांगळे यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी देणार्या पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई करुन त्याची शहराबाहेर बदली करण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व राज्य संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक मन्सूर शेख, राज्य संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, आजीनाथ शिंदे, ज्ञानेश्वर हिरे, अतुल लहारे, पुरुषोत्तम सांगळे, विठ्ठल शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.
पुरुषोत्तम सांगळे ज्येष्ठ पत्रकार व संपादक असून अकोला, नागपूर येथून प्रकाशित होणार्या एका वृत्तपत्राचे ते निवासी संपादक आहेत. सांगळे हे नगर शहरातील नागापूर पुलाजवळील राजमाता कॉलनी येथील रहिवासी आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांनी रविवारी दि.31 मे रोजी रात्री 10 ते 11 वाजेच्या सुमारास सांगळे यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करीत खोटी अॅट्रोसिटीची केस दाखल करून तुरुंगात डांबण्याची धमकी दिली.
याबाबतची तक्रार पुरुषोत्तम सांगळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी भा.द.वि. कलम 323, 504, 506 प्रमाणे व अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊन देखील या प्रकरणी गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. पोलीस कॉन्स्टेबल संदीप पितळे यांच्याकडून पुरुषोत्तम सांगळे यांच्या जीवितास धोका असून, आरोपी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत पोलीस कॉन्स्टेबल पितळे यांची शहराबाहेर बदली करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, सांगळे यांना धक्काबुक्की व मारहाण करत असताना पितळे यांनी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथील काही कर्मचारी बोलावले होते.
ते त्यांचे मित्र होते. संबंधित कर्मचारी त्यांच्या पोलीस स्टेशनची हद्द सोडून त्यांच्या मदतीसाठी का गेले होते? याची चौकशी करण्यात यावी, तर सांगळे यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व राज्य संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.