अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-शाळेची फी भरली नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणार्या वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करण्यात यावी व शाळेवर शिक्षणाधिकारी यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशी समितीची अहवाल तक्रारदार पालकांना देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी पालक वैभव बोर्डे, रमेश बेल्हेकर, संदीप गुंजाळ, रामदास ससे, तुकाराम गीते, जकी मुजावर, वैशाली साळवे, गजानन गीते आदी उपस्थित होते. गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये भीमराज गुंजाळ यांचे पाल्य ओम गुंजाळ (इ. 8 वी) व जय गुंजाळ (इ. 6 वी) मध्ये शिक्षण घेत आहे.
काही कारणास्तव गुंजाळ यांनी शाळेची फी भरली नाही. फी न भरल्याने शाळेने ऑनलाईन शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड दिला नाही. सदर विद्यार्थी शिक्षणापासून वंचिर राहत आहे. शालेय प्रशासनाशी वारंवार फोन केला असता तसेच शाळेत जाऊन भेट घेतली असता कोणत्याही प्रकारणे म्हणने ऐकून घेण्यात आले नसल्याचा आरोप पालक भीमराज गुंजाळ यांनी केला आहे.
या दोन्ही मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेल्यास त्यास पूर्णपणे शालेय प्रशासन जबाबदार राहणार आहे. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलने टाळेबंदीत ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने 2020-21 या शैक्षणिक वर्षीसाठी इतर फी वसूल करू नये याबाबत शिक्षणाधिकारी यांना दि.2 नोव्हेंबर रोजी अर्ज केला होता.
याची दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना पत्र पाठवून त्रिस्तरीय समिती स्थापन करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर अहवाल पालकांना देण्यात आलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. त्वरीत फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांचे बंद केलेले
ऑनलाईन शिक्षण सुरु करावे, पालकांकडून घेण्यात येत असलेल्या इतर अवाजवी फी वसुलीवर स्थगिती आणून शासनाने पालकांना कोरोनाच्या काळात न्याय द्यावा, फीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्या सदर शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.