अहमदनगर बातम्या

अजित पवार गटाला जागा सोडण्यास कार्यकर्त्यांचा विरोध, राहुरी मतदारसंघावर भाजपचाच हक्क !

Published by
Ahmednagarlive24 Office

राहुरी विधानसभेची जागा भाजपच लढवणार असल्याचा शब्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश पारख यांनी दिला आहे. त्यामुळे कोणी काही जरी सांगितले, तरी यात बदल होणार नाही. राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाची विधानसभेची जागा ही भाजपच्या उमेदवारासाठीच सोडावी, अशी मागणी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते माजी शहराध्यक्ष प्रकाश पारख यासह माजी तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, राजेश उपाध्ये राजेंद्र दरक यांनी केली आहे.

राहुरी विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना होण्यापूर्वी मतदारसंघातून प्रसाद तनपुरे हे आमदार म्हणून निवडून येत होते. तनपुरे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे देवळालीचे चंद्रशेखर कदम यांना हे निवडून गेले. तत्पूर्वी भाजपने (जनसंघाने) पक्षाचे ज्येष्ठ नेते आसाराम पाटील दुस यांना उमेदवारी दिली होती, पण त्या काळात भाजप जनसंघाच्या विचारांचे मतदार कमी होते.

कदम व दुस हे दोघे दोन टर्म राहुरी कारखान्यावर निवडून आल्याने तालुक्यात त्यांचे एक प्रस्थ होते, म्हणून भाजपने चंद्रशेखर कदम यांना उमेदवारी दिली व ते निवडून आले. पाच वर्षांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा माजी आमदार कदम यांना निवडून दिले, त्यावेळी मतदारसंघात चौरंगी निवडणूक झाली होती.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून एकदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रसाद तनपुरे निवडून आले. त्यानंतर आजपर्यंत पुनरचीत राहूरी नगर-पाथर्डी मतदारसंघात भाजपचे शिवाजी कर्डिले हे चार वेळा निवडून आले, तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचा मुलगा प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदा कर्डिले यांचा पराभव करून निवडून आले. मंत्री झाले.

त्यामुळे ही जागा भाजपचीच असून, ती महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडू नये, अशी मागणी भाजपचे निष्वावान कार्यकर्ते प्रकाश पारख यांसह कार्यकत्यांनी केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुरी विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसच लडवणार असल्याची वल्गना केली असून, ते हास्यास्पद आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा कधीच प्रचार केला नाही, आता विधानसभेची जागा सोडण्याची मागणी करीत आहेत. भाजपचे यापूर्वी आमदार असताना व खासदारपद भूषवणाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात मतदारसंघात भाजप वरिष्ठ नेत्यांच्या सहकायनि मोठी विकासकामे केली आहेत.

राहुरी मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणी चार वेळा भाजपचा आमदार निवडून आलेला आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढविली गेली चार पंचवार्षिक निवडणुक भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुरी मतदार संघात भाजपच्या जुन्या कार्यकत्यांनी व तळागाळातील कार्यकत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचे काम केले, मात्र यामध्ये काही अदृश्य असणाऱ्या शक्तींनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्याने भाजपच्या उमेदवाराला प्रथमच पराभव स्वीकारावा लागला.

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवाराला तालुक्यातून विरोधी महाआघाडीच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळाल्याने राहुरी मतदार संघातील उमेदवारी ही भाजपच्या उमेदवाराला मिळावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भाजपच्या कार्यकत्यांनी बैठक घेऊन आपली मागणी मान्य केली असून, त्यांनीही सदर जागा ही भाजपला मिळणार अशी ग्वाही दिली असल्याचेही प्रकाश पारख यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office