अहमदनगर बातम्या

Tisgaon News : अतिक्रमण सात दिवसांत काढून घेण्यात यावे प्रशासनाचे आदेश ! एकच खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Tisgaon News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील ग्रामपंचायतच्या गटनंबर २९६ मधील व्यापाऱ्यांसह या ठिकाणी पक्के बांधकाम करून वास्तव्यास असलेल्या ४०० हून अधिक लोकांनी केलेले अतिक्रमण सात दिवसांत काढून घेण्यात यावे अथवा

या गटनंबरमध्ये केलेल्या बांधकामासंदर्भात पंचायत समितीकडे खुलासा सादर करावा असे अशा नोटिसा पाथर्डी पंचायत समितीने संबंधितांना बजावल्याने तिसगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

तिसगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या गटनं २९६ मधील २३ एकरातील ४०० लाभधारकांना पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी या गटनंबरमधील गाळेधारकांसह,

या ठिकाणी शासकीय जागा बळकावून पक्के बांधकाम करणाऱ्यांना बांधकाम काढून घेण्याच्या आदेशासह या गटनंबरमध्ये केलेल्या बांधकामासंबंधी अथवा गाळे भाडेतत्त्वावर घेतल्यासंबंधी सात दिवसांत पाथर्डी पंचायत समितीकडे पुराव्यासह कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी अनेक गाळेधारकांना व या ठिकाणी बांधकाम करणाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तिसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक राजाराम गारुडकर यांनी ग्रामपंचायतच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून, ही अतिक्रमणे काढण्यासाठी ग्रामपंचायतविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे.

न्यायालयाने सदर अतिक्रमण निष्काशित करण्यायनत आदेशीत केले आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. ज्या गट नंबरमधील अतिक्रमणांबाबत गारुडकर यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्या गटनंबरमध्ये इतर लोकांसह शासकीय घरकुल योजनेच्या माध्यमातूनदेखील मोठ्या प्रमाणात पक्की घरे बांधण्यात आलेली आहेत.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायतने बांधलेले व्यापारी संकुल तसेच काही खासगी लोकांनी अनधिकृतपणे जागा बळकावून, बांधकामे केलेली आहेत तर काहींनी शासकीय जागेवर गाळे बांधून ते भाडेतत्वावर दिलेले आहेत.

ग्रामपंचायतने भाडे तत्त्वावर दिलेल्या गाळ्यांचा कागदोपत्री आकार आणि आज रोजी, या ठिकाणी झालेले चारपट पक्की बांधकामे, याकडेदेखील संबंधित याचिकाकर्त्यांने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ज्या गाळेधारकांकडे अथवा या शासकीय जागेत पक्के बांधकाम केलेले आहे,

अशा व्यक्तींकडे नियमित भाडेपट्टी व घरपट्टी भरलेली असणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्यांनी शासकीय कागदपत्रांचा आधार न घेता या गटनंबरमध्ये व्यवहार केलेले आहेत अथवा बांधकामे करून शासकीय जागा बळकावल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्रामपंचायतच्या गटनंबर २९६ मध्ये मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे, कोष्टी समाजाच्या स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण, पुरातन मंदिर बारवेवर केलेले अतिक्रमणदेखील याचिकाकर्त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

Ahmednagarlive24 Office