Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याच्यासह इतरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता दि. १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान या पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेचा अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्या वतीने अटक टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.
काल सरकारी अभियोक्ता अॅड. गवते यांनी लेखी म्हणणे सादर केले. या जामीन अर्जावर आता १६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या सदस्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्यांनी ठेवीदारांसोबत अर्धा तास चर्चा केली. ठेवीबाबत, आरोपींना अटकपूर्व जामीन, कर्जदार, अपहार आणि घोटाळेबाज आरोपी यांसह इतर विषयांवर चर्चा झाली. आरोपींसह कर्जदारांच्या व इतरांच्या मालमत्तांना अॅटॅचमेंट लावण्यासाठी त्वरीत कार्यवाही करा.
यासाठी मंत्रालयात प्रकरण पाठवा आणि अध्यादेश घ्या, असा आग्रह यावेळी ठेविदारांनी धरला. पतसंस्थेवर त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहे. या पतसंस्थेचा कारभार आता प्रशासकांच्या हाती गेला आहे.