न्यायालयाच्या निकालानंतर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू; मात्र पालकांना आले आहे वेगळेच टेन्शन ..!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी जाहीर झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया दि.२३ जुलैपासून सुरू होणार असल्याने २५ टक्के मोफत प्रवेशाची वाट पाहणाऱ्या पालक आणि विद्यार्थी आता सुटकेचा निःश्वास टाकणार आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर आता या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येण्यास सुरुवात होईल.

नगर जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ३२७ शाळा पात्र असून याठिकाणी ३ हजार २६ जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. याठिकाणी ९ हजार ६२६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यातून ऑनलाईन सोडत पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही मोफत प्रवेशाची प्रक्रिया रखडली होती.

मात्र, आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यंदा ही मोफत प्रवेश प्रक्रिया न्यायालयात अडकली होती. फेब्रुवारी महिन्यांत शिक्षण विभागाने या मोफत प्रवेशाबायत सुधारित आदेश काढले होते. या आदेशा विरोधात उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपिठात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर ११ जुलैला अंतिम सुनावणी होवून शुक्रवार (दि. १९) रोजी अंतिम निकाल न्यायालयाने दिला आहे.

त्यानूसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शिक्षण हक अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीची निवड व प्रतीक्षा यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली.

त्यानंतर आजपासून मोफत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस येणार आहेत. हे एसएमएस मिळणाऱ्या पालकांनी त्यांच्या पाल्याची निवड झालेल्या शाळेत २३ ते ३१ जुलैदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी केले आहे.

यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू झाले. त्यालाही आता महिना होत आला. त्यामुळे नियमित प्रवेश प्रक्रिया उरकून वर्गही सुरू झाले आहेत. दुसरीकडे आरटीई प्रवेशप्रक्रियेत आपल्या पाल्याला संधी मिळेल, या आशेने अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अद्याप कोठेही घेतलेले नाहीत.

पाल्याची प्रवेशाची संधी दोन्हींकडूनही हुकली तर त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. येत्या आठ दिवसांत २५ टक्क्यांनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा नवा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावरून प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती घेऊन जावे.

समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. तसेच, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Ahmednagarlive24 Office