अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी विशेषत: ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये मी स्वतः शालेय अभ्यासात सामान्य गुण मिळविणारा विद्यार्थी होतो.
तरी देखील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवू शकलो. प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अंगीकारल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहांतर्गत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनोज पाटील यांची जाहीर मुलाखत घेतली.
यावेळी ते बोलत होते. स्पर्धा परीक्षा, पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील संवादाची गरज, वाहतूक कोंडी, युवती – महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था अशा अनेक विषयांवरील विविध प्रश्नांना पाटील यांनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली.
कंप्यूटर इंजिनियर असणारे पाटील यांनी दोन वर्ष अध्यापक म्हणून काम केले आहे. आपल्याला घडवण्यामध्ये आपल्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचे तसेच सेवेतील वरिष्ठ तसेच कनिष्ठ सहकाऱ्यांकडून देखील अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.