अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- कोरोनामुळे शाळा पुर्णत: बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पन्नास टक्के विद्यार्थी क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी
देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी शिंदे यांना देण्यात आले.
तर सर्व सुरु असताना शाळा बंद का? हा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय बंद आहेत.
दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा आलेले आहे. इतर सर्व गोष्टी सुरू असताना फक्त शाळा महाविद्यालय हेच बंद आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ग्रामीण भागामध्ये काही गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नसताना देखील शासनाच्या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत.
ही बाब चुकीची आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुद्धा सुरू झालेले आहेत. ते शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी शाळा, महाविद्यालय सुरू राहिल्यास ते शक्य होणार आहे.
ऑनलाइन शिक्षण हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसून, विशेष करून ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क, गरीब विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.