यापूर्वी दोन वेळा आमदारकीची संधी हुकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना यावेळी मात्र विधान परिषदेच्या सभागृहाची प्रवेशिका मिळाली. मतांच्या आवश्यक कोट्यापेक्षा एक अधिकचे मत मिळवत गर्जे यांनी विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून गर्जे यांनी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि विधानसभेत जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतून निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
२०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात राज्यपालांच्या कोट्यातून गर्जे यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित झाले होते. ते आमदार झालेच असे समजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके वाजवण्यात आले होते. त्यांच्या गावी निवडीनंतरच्या अभिनंदनाचे फलकही झळकले होते. परंतु अंतिम क्षणी गर्जे यांचे नाव मागे पडले आणि त्यांची संधी हुकली.
आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर निवडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या यादीतही गर्जे यांच्या नावाचा समावेश होता. मात्र ती यादीच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडीत गर्जे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गर्जे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. पक्षाचे नाव तसेच चिन्ह हस्तगत करण्यात, आमदारांची प्रतिज्ञापत्र करून घेण्यात गर्जे यांची भूमिका महत्त्वाची होती.
त्याचा विचार करून पवार यांनी नव्या पक्षाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. पवार यांच्यावर दाखवलेली निष्ठा आणि अडचणीच्या काळात दिलेली साथ गर्जे यांच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल.