अहमदनगर बातम्या

Ahmednagar Politics : शिवसेना शिर्डी अन नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक, ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics News : लोकसभेच्या निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. खरे तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. एकाच वर्षात लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका होणार असल्याने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ-मोठ्या घडामोडी घडत आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता लोकसभेच्या जागा वाटपावर मंथन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही दोन्ही गटांमध्ये जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षांच्या माध्यमातून विविध लोकसभेच्या जागांवर दावा ठोकला जात आहे.

महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही जागांवर आघाडीमधील उबाठा शिवसेना गटाने दावा सांगितला आहे. या दोन्ही लोकसभेसाठी मविआचे जागावाटप अजूनही निश्चित झालेले नाही. मात्र याआधीच उबाठा शिवसेना मैदानात उतरली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नगर दौरा केला होता. संजय राऊत गेल्या काही दिवसांमध्ये दोनदा नगर दौऱ्यावर आले आहेत. विशेष म्हणजे नगर दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी शिर्डी आणि नगर दक्षिण या दोन्ही जागेसाठी त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असून त्यांना या दोन्ही जागा लढवायच्या आहेत असे म्हटले होते.

दरम्यान, राऊत यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे हे देखील नगर दौऱ्यावर येऊन गेले आहेत. 13 आणि 14 फेब्रुवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये संवाद मिळावे घेण्यात आले आहेत. अजून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काहीच बोलणे झालेले नाहीये. बंद दाराआड चर्चा सुरू असतील मात्र अजूनही जागा वाटपाबाबत फायनल निर्णय झालेला नाही.

अशातच मात्र शिवसेनेने या जागेसाठी स्वातंत्र हालचाली सुरू केल्या असल्याने मविआच्या घटक पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन सुरू आहे?

याबाबतच्या चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ठाकरे मविआ विरोधी तर भूमिका घेण्याच्या तयारीत नाहीत ना ? अशा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. खरेतर मविआच्या संभाव्य जागा वाटपात शिर्डीची जागा शिवसेनेला आणि नगरदक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्रजी पवार गट) यांना जाण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर मविआमध्ये चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशातच मात्र मध्यंतरी संजय राऊत यांनी नगर दौरा आयोजित करून दोन्ही जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. तेव्हापासून जागा वाटपाचे सर्व समीकरणच बिघडलेले असल्याचे पाहायला मिळत आहे.

कारण की सुरुवातीला शिवसेनेने दोन्ही जागा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर काँग्रेस या दोन्ही जागांच्या शर्यती बाहेर असतानाही नगर दक्षिण नको पण शिर्डीची जागा हवी असे सूर आवळू लागली आहे.

दुसरीकडे, मविआशी नुकतीच सोयरीक जुळवलेल्या वंचित बहुजन आघाडीने देखील शिर्डीच्या जागेवर आपला दावा सांगितला आहे. यामुळे आधीच मविआमध्ये अस्वस्थता असतांना नुकताच उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगर दौरा आयोजित केला.

या दौऱ्यावेळी त्यांनी शिर्डी लोकसभा आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सभा देखील घेतल्यात. 13 आणि 14 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये संवाद मिळावे घेतले आहेत. यावेळी त्यांनी या दोन्ही जागांसाठी शिवसेना तयार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये नजीकच्या काळात गदारोळ पाहायला मिळेल असे चित्र तयार होत आहे.

Ahmednagarlive24 Office