अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे. बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी सभासद बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, कॅप्टन विट्ठल वराळ, विनायक गोस्वामी, विक्रमसिंह कळमकर यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत. यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये चौकशी अधिकार्‍यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत.

गैरव्यवहारांची चौकशी सुरू असताना मुदत संपलेले संचालक मंडळ सत्तेत राहणे उचित नाही. मुदतवाढ मिळालेल्या संचालकांकडून आणखी गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार सभासदांच्या आणि बँकेच्या आर्थिक हितासाठी घातक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नेमणुक करावी व बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक विहित वेळेत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सैनिक बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार! सैनिक बँक संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपला होता. या संचालक मंडळाने पदावर काम करत असताना जबाबदारी व कर्तव्यात कसूर केल्याने संचालक मंडळाला मुदत वाढ देऊ नये, अशी याचिका सभासद बाळासाहेब नरसाळे यांनी औरंगाबाद न्यायालयात दाखल केली होती.

न्यायालयाने 14 सप्टेंबर 2021 रोजी सुनावणी ठेवत बँक संचालक मंडळाला बाजू मांडण्याची संधी दिली आहे. मुदत संपूनही पदावर असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी झाल्याने न्यायालयाचा काय निर्देश होतो याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान औरंगाबाद उच्च न्यायालयाची बँकेला नोटीस आल्याने या संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार असून, पुढील महिन्यात प्रशासक येण्याची दाट शक्यता असल्याचे सहकारातील जाणकार विनायक गोस्वामी यांनी सांगितले.