बिबटयानंतर आता ‘या’ प्राण्याच्या हल्ल्याने शेतकरी झाले भयभीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने यापूर्वी मानवीवस्तीवर देखील प्राणघातक हल्ले चढविले आहे. यामध्ये काहींचा बळी देखील गेला आहे.

मात्र हे संकट कायम असताना आता एका नव्या प्राण्याच्या हल्ल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेत संतोष दराडे नामक शेतकरी जखमी झाले. याबाबत वन विभाग सोमवारी रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी संतोष भीमराव दराडे शेतात काम करीत होते.

रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अचानक रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावले. त्यांनी गव्याचा पाठलाग केला; परंतु अंधार पडू लागल्याने गवा पळून गेला.

ग्रामस्थांनी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी संतोष दराडे यांना फक्राबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

फक्राबाद येथील पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी घटनेची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली. त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांना माहिती देऊन या भागात वन विभागाचे पथक पाठविण्यास सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24