अहिल्यानगर : वटपौर्णिमा अन् मकरसंक्रात हा सण विवाहित महिलांसाठी खास मानले जातात. कारण या सणाच्या वेळी पत्नी पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करतात अशी या सणांची महती सांगितली जाते.
मात्र या सणाच्या काही दिवस आधीच अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनेच प्रियकर व भावाच्या मदतीने खून केला. तसेच त्याचा मृतदेह ओळखू येवू नये व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करत मृतदेह शेतामधील मुरूमाच्या खदानीत अर्धवट पुरून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील रवळगाव या गावच्या शिवारात शुक्रवारी (१०जानेवारी) रवळगाव गावचे शिवारात एका शेतामध्ये अज्ञात इसमाचा डोक्यात दगड घालून चेहरा विद्रुप करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुरमाच्या खदानीत अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आला होता.
याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांना याबाबत तपासाचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी दोन पथकांना याआबाबत तपासाच्या सुचना दिल्या.
पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा संतोष शिवाजी काळे (रा.पळसदेव, ता.इंदापूर, जि.पुणे) याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता
त्याने त्याचे व ललिता दत्तात्रय राठोड (रा.जमशेदपूर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) हिचे अनैतिक प्रेमसबंध होते. या प्रेमसबंधाला तिचा पती हा विरोध करत असल्याने त्यांनी ललिता राठोड हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव (रा.सिंगर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) यांनी मयत दत्तात्रय वामन राठोड (रा.जमशेदपूर, ता.डिग्रस, जि.यवतमाळ) याचा गळा आवळून खून केल्याची माहिती दिली.
पथकाने संतोष शिवाजी काळे यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, मागील दोन वर्षापासुन मयत दत्तात्रय वामन राठोड व त्याची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड व तिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव असे ऊस तोडणीचे कामास होते.
त्यातून ओळख होऊन संतोष शिवाजी काळे व ललिता दत्तात्रय राठोड यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती ललिता हिचा भाऊ प्रविण प्रल्हाद जाधव यास झाली होती. तसेच ललिता राठोड हिचा पती दत्तात्रय राठोड हा दारू पिऊन तिच्यावर संशय घेऊन ललिता हिस सतत मारहाण करत होता. दि.८ जानेवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संतोष काळे हा ललिता हिला भेटण्यासाठी गेला.
त्यावेळी तिचा पती दत्तात्रय राठोड तेथे आला व त्यांच्यात वाद होऊन त्याने पत्नी ललिता हिस मारहाण केली. त्यावेळी संतोष काळे, ललिता राठोड व प्रविण जाधव यांनी मिळून दत्तात्रय राठोड यास मारहाण करून, त्याचा दोरीने गळा आवळून त्यास ठार मारले.
त्याचा मृतदेह रात्री ते राहात असलेल्या कोपीमध्ये ठेवला. दि.९ जानेवारीला संतोष काळे याने त्याच्याकडील चारचाकी वाहनाने दत्तात्रय राठोड याचा मृतदेह प्रविण जाधव याच्यासह मिरजगाव परिसरामधील एका शेतातील खड्डयामध्ये टाकला. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणुन तेथील एक दगड उचलून तोंडावर टाकला अशी माहिती सांगीतली.