अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष संभाजी कदम यांच्यासह बारा माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरातील ठाकरे सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेशामुळे शिंदे सेनेला नगर शहरात मोठी ताकद मिळाली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या फुटीनंतर आतापर्यंत ८० टक्के माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे सेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात केवळ काही मोजकेच माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उरले आहेत.
शिंदे सेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये शहराध्यक्ष संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराडे, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, सुरेश तिवारी, संतोष गेनप्पा, दत्तात्रय कावरे, संदीप दातरंगे, परेश लोखंडे, कैलास शिंदे आणि संग्राम कोतकर यांचा समावेश आहे. याआधीच माजी नगरसेवक दिलीप सातपुते आणि सचिन जाधव शिंदे सेनेत सामील झाले होते. आता झालेल्या इनकमिंगमुळे ठाकरे सेनेला दुसरा मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.
या प्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करत, “महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकेल आणि नगरच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही,” असे आश्वासन दिले. त्यांनी यावेळी सांगितले की, नगरमध्ये शिवसेनेचा वारसा कायम राहील आणि आगामी निवडणुकीत मोठे यश मिळेल.