अहमदनगर बातम्या

अहिल्यानगर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महानगरपालिकेकडून होणार तपासणी! आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

Published by
Ratnakar Ashok Patil

महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत राज्यातील नोंदणीकृत खाजगी रुग्णालयाची तपासणी करुन दैनंदिनी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

महिनाभरात ही तपासणी पुर्ण करून त्याचा दैनंदिन अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयास सादर करावा, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

खासगी रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम, २०२१ अंतर्गत नियमांचे काटेकोर पणे पालन होते किंवा नाही, याची खातरजमा या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्याने रुग्णालयामध्ये आकारण्यात येणा-या फी व इतर रुग्णालयीन सेवेचे शुल्क, दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागांत लावण्यात यावे.

तसेच महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ मधील अंतर्भूत रुग्ण हक्क संहिता रुग्णालयाच्या दर्शनी भागांत स्वच्छ अक्षरात लावण्यात यावी, असे निर्देश आहेत. याबाबत तसेच, रुग्णालयातील मंजूर खाटा व प्रत्यक्षात असलेल्या खाटा संख्या,

अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र व फायर ऑडिट, जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट, नर्सिंग ॲक्टची अंमलबजावणी आदींची महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

याबाबतची संपूर्ण कार्यवाही एक महिन्यांत पूर्ण करावयाची असल्याने दैनंदिन रुग्णालय तपासणीचा अहवाल करुन एकत्रित अहवाल आयुक्तालयास सादर करावा. यात सर्व नोंदणीकृत रुग्णालयांकडून महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम २०२१ मधील नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याची खातरजमा करून स्पष्ट अहवाल द्यावा.

आपल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन 2 ते 5 रुग्णालयांची तपासणी करून कार्यालयाकडे सादर करावा, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी तपासणीसाठी नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Ratnakar Ashok Patil